अहमदनगर- निघोज येथील जळीत कांड हे पोलीस तपासात ऑनर किलिंग नसल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मृत रुक्मिणीचे वडील, चुलते आणि मामा यांचा जळीत प्रकरणाशी संबंध नाही, असे पोलिसांनी न्यायालयात अर्जाद्वारे सांगितले आहे.
नगर जिल्ह्यातील निघोज येथील कथित ऑनर किलिंग प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले. पुरोगामी आणि पुढारलेल्या महाराष्ट्रात प्रेमविवाह केला म्हणून मुलीच्या घरच्यांनी मुलीस आणि जावयास रॉकेल टाकून पेटवून दिल्याची बातमी पाहून महाराष्ट्र हळहळला. मात्र, पोलीस तपासात आता नवीनच माहिती पुढे आल्याने हे प्रकरण ऑनर किलिंगचे नसल्याचे तसेच यातील आरोपी वडील, चुलते आणि मामा हे या जळीत कांडात आरोपी नसल्याचे सांगत पोलिसांनी आज पारनेर न्यायालयाला अर्ज करत अटक असलेल्या तिघांनाही प्रकरणातून वगळावे, अशी विनंती केली आहे.
पोलिसांचे म्हणणे ऐकल्यानंतर तक्रारदार आणि रुक्मिणीचा पती मंगेश रणसिंग याचा जबाब पोलिसांच्या अर्जावर घेण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने दिले आहेत. सध्या या प्रकरणात अटक केलेल्या तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
घटना २ मे ला घडल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात सुरुवातीला मृत रुक्मिणीचे चुलते आणि मामा यांना ५ मे रोजी अटक केली होती. तर वडिलांना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले होते. वडील हे आजारी असल्याने त्यांच्यावर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ऑनर किलिंग म्हणून हे प्रकरण पुढे आल्याने पारनेर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गांभीर्याने तपास सुरू केला होता. या तपासात पत्नी रुख्मिणीला पती मंगेश नेहमी मारहाण करत असल्याची माहिती पुढे आली. तसेच रुख्मिणीचा छोटा भाऊ निंचू (६) याने मंगेशनेच रुक्मिणीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे पोलीस जबाबात सांगितले.
घटना घडल्या पासून पोलिसांनी दोनही बाजूंचे तसेच स्थानिक अनेक लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. त्याआधारे तसेच परिस्थिती जन्य पुरावे पाहता या जळीत प्रकरणात वडील,चुलते आणि मामाचा कुठलाही संबंध न आढळल्याने पोलिसांनी त्यांना क्लीनचिट दिली आहे.
नव्याने आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. आता पोलिसांनी पारनेर न्यायालयात केलेल्या अर्जावर संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला पती मंगेश याचे म्हणणे मागवण्यात आलेले आहे. मंगेशवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकूणच सध्या तरी हे प्रकरण ऑनर किलिंगचे नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आता तपासाची सर्व दिशा रुक्मिनीचा पती मंगेश रणसिंग याच्यावर केंद्रित केली आहे.