अहमदनगर - राज्याची परिस्थिती भीषण असून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता आणखी कडक निर्बंध लावावे लागणार असल्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. जेव्हा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा काही लोकांनी रस्त्यावर उतरून विरोध केला. त्यामुळे काही सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र दिलेल्या सवलतीचा काही नागरिक गैरफायदा घेत असल्याने निर्बंध अधिक कडक करावे लागतील असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनवरील बंदी तीन ते चार दिवसात उठणार असल्याने त्याचा फार मोठा प्रभाव संपुर्ण देशात पडला आहे. ज्या राज्यात लोकसंख्या आधिक, कोरोना संक्रमण आधिक, मृत्यूचे प्रमाण आधिक अशा ठिकाणी लसींचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे केंद्राने आपल्या या धोरणात बदल करून, योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा करावा असेही यावेळी हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते शिर्डीमध्ये आयोजित बैठकीत बोतल होते.
मुश्रीफ यांची कोविड केअर सेंटरला भेट
जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, यात राहाता आणि कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुश्रीफ यांनी शिर्डीतील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहाणी केली. यानंतर त्यांनी साईबाबा संस्थान आणि जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेवून शिर्डीतील साईबाबा सुपर हॉस्पीटलमधील 250 पैकी 150 बेड कोविडसाठी तर साईनाथ रुग्णालयातील संपुर्ण 300 बेड कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राहाता आणि कोपरगाव तालुक्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून, काही मंत्री त्यांच्याच भागात प्लॅंट असल्याने ऑक्सिजन पळवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समप्रमाणात ऑक्सिजन मिळेल तसेच यासाठी अहमदनगर येथे बैठकीत आपण तशा सूचना देणार असल्याचे देखील यावेळी स्पष्ट केले.
...तर अधिक कठोर निर्बंध लावावे लागतील - मुश्रीफ
सध्या राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना त्रास होवू नये म्हणून काही सवलती देण्यात आल्या आहेत. मात्र काही लोक त्याचा गैरफायदा घेत असल्याचे देखिल निदर्शनास येत आहे. जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत आणि कोरोना अटोक्यात आला नाही तर राज्य सरकारला संचारबंदी कायम करावी लागू शकते, असं देखील पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात समुद्रामार्गे येणार ऑक्सिजन; राज्य सरकारच्या हालचाली सुरू