अहमदनगर - शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषीत केला. दरम्यान, आचारसंहिता लागू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'भाजप चलेजाव'ची घोषणा केली. अहमदनगर येथील पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
हेही वाचा - 'EVM मध्ये घोळ करण्यासाठी दोन दिवसांनी मतमोजणी होणार आहे का?'
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला गळती लागली असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना झंझावाती दौरा सुरू केला आहे. पवार यांनी अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा संदर्भ घेत भाजप सरकार चलेजावची घोषणा केली आहे. ज्या प्रमाणे महात्मा गांधींनी चले जाव म्हटले होते, त्याचप्रमाणे सध्याच्या भाजप सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ तुम्हा-आम्हांवर आली असल्याचे पवार आपल्या भाषणात म्हणाले. त्याग करण्याची भूमिका ज्या परिवाराने केली त्या नेतृत्वाचा संघर्ष कालखंड ऐतिहासिक अहमदनगर शहरापासूनच सुरू झाला होता. पंडित जवाहरलाल नेहरूंचा दाखला त्यांनी यावेळी दिला.
"आज निवडणुका घोषित झाल्या असून ज्या भाजपने समाजस्वास्थ बिघडवले, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, बेरोजगारी वाढवली अशा सरकारला आता चलेजाव म्हणण्याची वेळ आली आहे."
नाशिक येथील नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर पवार यांची प्रतिक्रिया -
नाशिक येथील मोदी यांच्या भाषणावर पवार म्हणाले, "पंतप्रधान आपल्या भाषणात शेती आणि उद्योगातील मंदी यावर बोलतील असे वाटले होते मात्र, त्यांनी काहीही भाष्य केले नाही. तसेच मंदी कशी थांबणार आहे? काय उपाययोजना चालू आहेत. यावर एक शब्द काढला नाही. यामुळे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आता हे स्पष्ट झाले आहे." तसेच पवार म्हणाले, माझ्यावर मुख्यमंत्री बोलत होते ते कमी पडले म्हणुन त्यांनी पंतप्रधानांना बोलावले. मला वाटलं ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयावर बोलतील. मात्र, ते देखील माझ्यावर बोलले म्हणजे आमचं चांगलं चाललं आहे असं समजायला काही हरकत नाही.
हेही वाचा - सकाळपासून अनेकांचे फोन, काँग्रेसमध्ये येण्यास बरेचजण इच्छुक - बाळासाहेब थोरात