अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्याचप्रमाणे पारनेर मतदारसंघांत निलेश लंके यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून अंतिम मानली जात आहे.
हेही वाचा... जामनेर विधानसभा मतदारसंघ : भाजपचे 'संकटमोचक' मात्र विरोधकांसाठी संकट ?
रोहित पवार आणि निलेश लंके या दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपले तिकीट निश्चित मानत, गेल्या वर्षभरापासून आपल्या मतदारसंघात कार्यक्रमांचा आणि प्रचाराचा धडाका लावलेला आहे. रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. तसेच ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवार कर्जत-जामखेड मतदारसंघात येतात, आणि त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असल्याने, कर्जत जामखेडमधील इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीमधील काही स्थानिक नेते मंडळींमध्ये चलबिचल सुरू आहे.
हेही वाचा... बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ : मुनगंटीवार विजयाची 'हॅट्रिक' मारणार?
उमेदवारी नाकारल्यास कर्जत तालुक्यात वजन असलेला गुंड परिवार भाजपकडे-
कर्जत-जामखेड मतदारसंघातून इच्छुक असलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेंद्र गुंड यांचे नाव आघाडीवर आहे. तर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. या जागेवर आपल्यालाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच पक्षाच्या मुलाखती मध्ये केलेली आहे. मात्र आता रोहित पवार यांचे नाव अंतिम समजले जात असताना कर्जत तालुक्यात वजन असलेला गुंड परिवार भाजपकडे वाटचाल करत असल्याची जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा... नेवासा विधानसभा मतदारसंघ : तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाराज उमेदवार बंड करण्याची शक्यता
कर्जत-जामखेड प्रमाणेच पारनेर मतदारसंघामध्ये शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले निलेश लंके यांची उमेदवारी ही अंतिम मानली जात आहे. मात्र या ठिकाणाहून 2014 ला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले आणि यंदाही उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला आहे. जर उमेदवारी मिळाली नाही तर आपल्याला सर्व पर्याय उपलब्ध असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा कल हा भाजपकडे असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा... श्रीरामपूर विधानसभा: युतीकडून तिकीटासाठी रस्सीखेच, भाऊसाहेब कांबळेंच्या शिवसेना प्रवेशाने उत्सुकता
यामुळे एकूणच आतापर्यंत राष्ट्रवादी पक्षासोबत अनेक वर्ष एकनिष्ठ असलेल्यांनी उमेदवारी मिळाल्यास बंडाची हाक दिल्याने, कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांना तर पारनेर मतदारसंघात निलेश लंके यांना या संभाव्य पक्षांतराचा आणि बंडाचा फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघातून गुंड परिवाराची समजूत काढण्याचे काम पवार कुटुंबीयांकडून सुरू आहे., तरीही अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेला गुंड परिवार नेमकी काय भूमिका घेतात याची उलटसुलट चर्चा मतदारसंघात सुरू आहे. रोहित यांच्या अनेक कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिले आहेत. मात्र अजित पवार यांची अनुपस्थिती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.