अहमदनगर - वेतनवाढीबाबत होत असलेली चालढकल, जुनी पेन्शन पद्धत, पाच दिवसांचा आठवडा आदी मागण्यांसाठी आणि बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्र सरकारचे दुर्लक्षित धोरणांच्या निषेध म्हणून, राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवारी) बंद पाळला आहे. या बंदमध्ये देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील दहा लाख कर्मचारी सहभागी झाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास 11 ते 13 मार्च असे तीन दिवस बँका बंद ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
हेही वाचा - सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल करण्यासाठी टीमचे कठोर प्रयत्न
जुना करार एक नोव्हेंबर 2017 साली संपल्यानंतर वेतन कराराबाबत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन बँक असोसिएशन विविध कारणे देत चालढकल करत आहेत. मोठ्या उद्योगपतींचे थकीत आणि बुडीत कर्जे मिटवण्यासाठी बँकांचा फायदा वापरला जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना बँका तोट्यात असल्याचे चुकीचे कारण देत असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सन्मानजनक वेतन वाढ करार लवकर न झाल्यास 11 ते 13 मार्च असे तीन दिवस बँका बंद ठेवण्यात येतील आणि त्यानंतरही निर्णय न झाल्यास एक एप्रिलपासून देशभरातील बँका बेमुदत बंद ठेवण्यात येतील, असा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
हेही वाचा - ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना; केंद्र करणार 25 लाख कोटींची तरतूद