अहमदनगर- अकोले तालुक्यातील राजूर येथे बस स्टँड परिसरात सोने चोरी करणाऱ्या श्रीरामपूर येथील गुन्हेगारांच्या सराईत टोळी गजाआड झाली आहे. राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी हजारो रुपयांचा नेकलेस हार हस्तगत केला आहे.
साहिल नाशिक खान (रा. श्रीरामपूर), अर्जंन कानिफनाथ भोसले (रा. अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर), कमलेश उत्तम पवार (रा. अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर), गुफरान निसार पठाण (रा. सोमेश्वर पथ श्रीरामपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या चौघांना राजूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चौकशी केली असता यापूर्वीही त्यांनी राजूर परिसरात असे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा-मारहाण प्रकरणी खासदार भावना गवळींवर गुन्हा दाखल
राजुर शहरातील कुसुम लक्ष्मण नाडेकर यांचा 96 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस राजुर बस स्टॅन्ड येथून चोरीला गेला होता. नाडेकर यांनी राजूर पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार तसेच पोलीस कर्मचारी हे त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी करत होते. पोलीस निरीक्षक पाटील यांना गुप्त मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अकोले बस स्टँड येथे सापळा रचला. पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस कर्मचारी आघाव, पोलीस कर्मचारी फटांगरे, पोलीस कर्मचारी गाढे, पोलीस कर्मचारी वाडेकर व अकोले पोलीस स्टेशनचे आदींनी मिळून शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले.
हेही वाचा-बायकोसाठी कायपण, लग्नाच्या वाढदिवशी भेट दिली चंद्रावर जमीन
आरोपींना मुद्देमालासह राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास चालू आहे. या कामगिरीनंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी राजूर पोलिसांचे कौतुक केले आहे