अहमदनगर - जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात एक-एक म्युकर मायकोसिसचा रुग्ण आढळला असून जामखेडच्या रुग्णांवर नगरमध्ये तर श्रीगोंदा येथील रुग्णावर पुण्यात उपचार सुरू आहे.
जामखेडच्या रुग्णावर नगरमध्ये उपचार-
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील एका अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीला नुकताच कोरोना होऊन गेला. कोरोनातून बरे झाल्यानंतर या व्यक्तीला म्युकर मायकोसिसची लक्षणे दिसू लागली. त्याचे दोन्ही डोळे सुजले, एका डोळ्याची नजर कमी झाली. त्यांच्यावर नगर मधील एका रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. मात्र उपचाराचा खर्च मोठा आहे. पत्नी औषधोपचारासाठी पैशाची जुळवाजुळव करत आहे, पण परस्थिती हालाखिची असल्याने रुग्णाच्या नववीत शिकणाऱ्या मुलीने जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांची भेट घेऊन मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी दानशूर नागरिकांना मदतीसाठी आवाहन करत शक्य ती शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
श्रीगोंद्याच्या रुग्णाच्या मदतीला धावले आरोग्यमंत्री -
श्रीगोंदा शहरातही एक म्युकर मायकोसिसचा रुग्ण आढळला असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. आर्थिक परस्थिती सामान्य असलेल्या या रुग्णाला म्युकर मायकोसिसची लक्षणे दिसून आल्यानंतर नातेवाईकांनी नगर शहरात उपचारासाठी माहिती घेतली. मात्र मोठा खर्च उपचाराला सांगण्यात आल्याने नातेवाईकांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार यांना संपर्क केला. त्यांनी ही बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कानांवर घालून मदतीची मागणी केली. टोपे यांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात संपर्क करून रुग्णांवर उपचाराची सूचना केली. त्यानुसार आता या रुग्णावर उपचार सुरू आहेत.