अहमदनगर - नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे फोनवर किती वेळ बोलतेस? असे विचारणाऱ्या 18 वर्षीय मुलाला आईने मध्यरात्री झोपेत असताना तोंड दाबून चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात आई विरोधात मुलाने गुन्हा दाखल केला असून जखमी मुलावर उपचार सुरु आहेत.
सोमवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास शोभा दिपक साळुंखे फोनवर बोलत होती. यावेळी मुलगा विशाल दिपक साळुंखे (वय १८) याने तिला हटकले आणि किती वेळ फोनवर बोलतेस असे विचारले. तेव्हा आई शोभा हिने 'मी कितीपण वेळ बोलेन, तुला काय करायचे आहे' असा उलटजवाब मुलाला दिला. यानंतर विशाल जेवण करून अंगणात झोपलेला असताना मंगळवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शोभाने, विशालचे तोंड दाबून चाकूने कानाखाली आणि तोंडावर वार केले. स्वत:चा बचाव करण्यासाठी विशालने हाताने चाकू धरण्याचा प्रयत्न केला असता, तुझ्यात किती बळ आहे ते पाहतेच, असे म्हणत आई शोभा हिने विशालवर हल्ला सुरुच ठेवला. या हल्यातून स्वत:ची सुटका करून घेत विशालने पोलिसात धाव घेतली. आई विरोधात तक्रार नोंदवली आहे.
मोबाईल वर बोलण्याच्या किरकोळ कारणावरून आईने मुलावर थेट चाकूने हल्ला केल्यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. मंगळवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला असून जखमी विशालवर उपचार सुरु आहेत.