अहमदनगर - हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या नगर येथील मोहरम विसर्जन मिरवणुक या हुसेन...या... हुसेन अशा जयघोषात पार पडली. यावेळी सवाऱ्यांना खांदा देण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. ही मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी सवाऱ्यांसोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा - निळवंडे धरणातून 34 हजार 125 विसर्ग सुरू, प्रवरेला पूर परिस्थिती
कोठला येथून छोटे इमाम हुसैन यांच्या सवारीने मोहरम मिरवणुकीला प्रारंभ झाला. तर मंगलगेट हवेली येथून मोठे इमाम हुसैन यांची सवारी निघाली. सवारी घेऊन जाणाऱ्या भाविकांवर ठिक-ठिकाणी पाणी आणि फुले टाकण्यात येत होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी कोठला परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा - संगमनेर तालुक्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
विविध धर्माच्या नागरिकांनी नवसाचे मोरचंद सवारीला लावण्यासाठी देखील गर्दी केली होती. यंदा गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आल्याने एक वेगळा उत्साह शहरात पाहायला मिळाला. मोहरम विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सवाऱ्यांचे स्वागत करून दर्शन घेण्यात येत होते.