अहमदनगर - कोरोना संसर्गाने सगळीकडे थैमान घातले आहे. कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून जामखेड शहरतील आरोळे कोविड सेंटर व आमदार रोहित पवार यांचे नवनवीन प्रयोग सुरू आसतात. आरोळे कोविड सेंटरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लवकर आटोक्यात आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्यातर्फे बारामती अॅग्रोच्या माध्यमातून आरोळे कोविड सेंटरला पन्नास ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन सुपूर्द करण्यात आल्या. तसेच कोरोना रूग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आरोळे कोविड सेंटरमधील रूग्णांना स्वतःच्या हाताने जेवण वाढले व तब्येतीची विचारपूस केली. ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे असलेले आणि स्वतः आमदार असलेले रोहित पवार हे चक्क वाढप्याच्या भूमिकेत दिसल्याने त्यांच्या सामाजिक जाणिवेबद्दल ते चर्चेत आले आहेत.
बारामती अॅग्रोकडून ५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन -
नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात आ. रोहित पवार कार्यरत आहेत. रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन त्याच्या घरी तो परतावा यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्यास आ.रोहित पवार यांनी लक्ष देत ग्रामीण भागातील रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. याच दृष्टिकोनातून रोहित पवार यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीतून बारामती अॅग्रोच्या माध्यमातून ५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन आरोळे कोव्हीड सेंटरला सुपूर्द केल्या.
रुग्णांना कोविड काळात मानसिक आधार गरजेचा-
औषधोपचारासह रूग्णांना योग्य मानसिक आधार दिल्यास लवकरात लवकर रूग्ण बरे होतात. मात्र कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर अनेक नातेवाईक या रूग्णांकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे कोरोना रूग्ण मानसिकदृष्ट्या अधिक खचून जातात. पण जर रूग्णांना योग्य औषधोपचार व मानसिक आधार मिळाला तर रुग्ण लवकरात लवकर बरे होतात. म्हणूनच आमदार रोहित पवार यांनी आरोळे कोविड सेंटर मधील कोरोना रूग्णांशी संवाद साधला. तब्येतीची चौकशी केली व स्वतःच्या हाताने जेवणही वाढले. यावेळी कोविड सेंटरचे संचालक डॉ. रवी आरोळे, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे उपस्थित होते.