अहमदनगर - संगमनेर तालुक्यालाही निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अनेक भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आज (शुक्रवार) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावून केली. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशा सुचना थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचे मोठे संकट आले होते. सरकार व प्रशासनाने वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चांगली आपत्कालीन व्यवस्था केली होती. कोकण किनारपट्टीवर या निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यासह शेजारील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या पिकांचे व इतर नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या हाताशी आलेला घास वादळाने हिसकावून घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार हे कायम शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. या वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे व इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
या वादळाने तालुक्यात अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला असून, तोही तातडीने सुरळीत करण्यासाठी काम करावे. या वादळामुळे नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.