अहमदनगर- जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मिनाक्षी प्रमोद गोंदकर यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. गोंदकर सध्या नगर जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या व्हा.चेअरमन पदावर कार्यरत आहेत. सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
नगर जिल्ह्यात सर्वाधिक उलाढाल व नफा मिळविणाऱ्या शिर्डीतील विविध कार्यकारी सोसायटीची नुतन पदाधिकारी निवड करण्यात आली. माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. व्हा.चेअरमनपदी विजय गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
साईबाबांच्या कृपेने मला शिर्डी सोसायटीच्या प्रथम महिला चेअरमनपदाचा मान मिळाला हे माझे भाग्य आहे, असे मिनाक्षी गोंदकर म्हणाल्या आहेत. चेअरमनपदी काम करताना संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल. संस्थेचा नावलौकिक जिल्ह्यात वाढविण्यासाठी तसेच अधिकाधिक नफा मिळवून संस्था नावारुपास आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोंदकर यांनी सांगितले आहे.
शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते,साईनिर्माण उदयोग समुहाचे संस्थापक विजयराव कोते, ज्ञानेश्वर गोंदकर , गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, दुध संस्थेचे चेअरमन महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, माजी चेअरमन दिगंबर गोंदकर, यांचे नेतृत्वाखाली व सहाय्यक निबंधक डॉ.जितेंद्र शेळके यांचे उपस्थितीत सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.