अहमदनगर - वर्षाच्या अखेरच्या दिवशी (31 डिसेंबर) अहमदनगर जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. यात भाजपने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांची अध्यक्ष तर, काँग्रेसचे प्रताप शेळके यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
हेही वाचा - नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक 'भंडारदऱ्या'च्या पायथ्याशी
या निवडणुकीवेळी अनेक राजकीय घडामोडी सुरू होत्या. जुळवाजुळवीचे राजकारण करणाऱ्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना यावेळी मात्र भाजपच्या उमेदवारांसाठी ही किमया साधता आली नाही. निवडणूक प्रक्रियेसाठी गटनेता निवडीत काँग्रेस पक्षाने आम्हाला डावल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांना समोर ठेवून शालिनी विखे यांनी केला. मात्र, त्यांच्या या आरोपाला थोरातांचे भाचे आणि प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. त्या पक्षाच्या कोणत्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी येत असतात का? असा प्रश्न तांबे यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद निवडणुकीत मला पाडण्यासाठी त्यांनी त्यावेळी शिवसेनेशी युती केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची हार झाली असली तरी त्याची मोठी झळ राधाकृष्ण विखे यांना बसणार असल्याच्या चर्चा आहेत. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा विखेंमुळेच झाल्याचा आरोप भाजपच्या पराभूत उमेदवारांनी केला होता. अशात गरजेच्यावेळी जिल्ह्यात जादुई करामत करण्यात अग्रेसर असलेल्या राधाकृष्ण विखेंना आज मात्र काही चमत्कार करता आला नाही. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात त्यांना अजून काही आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. आतापर्यंत बाळासाहेब थोरातांवर नेहमीच थोडे वरचढ असलेले राधाकृष्ण विखे सध्या मात्र खूपच मागे पडतात की काय, असे चित्र आहे. तसेच राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणावर याचा परिणाम नजीकच्या काळात दिसणार आहे.