अहमदनगर - जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रात्रीपासून पाऊस सुरूच आहे. नगर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून घरांमध्ये पाणी शिरले आहे, तर काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख रस्ते बंद झाले आहेत. शेवगाव-गेवराई मार्ग पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस सध्या बंद ठेवला आहे. हवामान शाळेच्या अंदाजानुसार अजूनही पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नांदनी आणि चांदणी नदीला मोठा पूर
सोमवारी रात्री झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे शेवगाव तालुक्यातील वरुर येथील नांदणी व चांदणी नदीला पूर आल्याने ऊस, कापूस, सोयाबीन व तूर या उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच वरुर गावात पाणी शिरल्याने ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी ऑफिस, वाचनालय, मारुती व शनि मंदिराचा परिसर पाण्याखाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे व पुरामुळे नदी काठचे रहिवासी भीतीच्या सावटाखाली आहेत.
आखेगाव परिसरात अतिवृष्टी
शेवगाव तालुक्यातील आखेगाव, भगूर, वरूर, सोमटने या गावात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. पुराच्या या पाण्यात अनेक शेळ्या, जनावरे वाहून गेल्याची माहिती असून नागरिकांनी रात्र जागून जीव वाचवले आहेत. नदीला महापुराची परिस्थिती दिसून येत आंबे, नदी लगतच्या शेतात, घरांत पाणी शिरले असून अनेक नागरिकांना पोलीस-प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. पुराचे पाणी काही ठिकाणी जास्त असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत.
पाण्यात अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप काढले
शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील नदी पात्रात ट्रकसह ड्रायव्हर पाण्यात अडकला होता. ट्रक पाण्याखाली गेल्याने ड्रायव्हर टपावर उभा राहिला, सकाळी पोलीस, महसूल, पोलीस यांच्या मदतीने त्याला दोरी टाकून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
नगर शहरात रात्रीपासून संततधार सुरूच
नगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून काल सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने उसंत न घेता मुसळधार सुरूच ठेवली आहे. रात्रीपासून नगर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सीनानदीला पूर परस्थिती असून नगर-कल्याण महामार्ग, नालेगाव-लांडेथळ रस्ता, सावेडी-बोल्हेगाव रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीला बंद झाला आहे. नगर शहरातील रस्तेही झाले जलमय झाले असून सखलभाग असलेल्या नालेगाव परिसरातील काही नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.
जेऊरमध्येही ढगफुटी, उच्चांकी पावसाची नोंद
नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई आणि परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली असून धनगरवाडी आणि परिसरातील कांदे, मूग, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकरी वर्गात कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे. पावसाचे प्रमाण एवढे आहे, की पिंपळगाव माळवी तलाव याच पावसात शंभर टक्के क्षमतेने भरू शकतो, अशी शक्यता आहे. बाजरी पीकांसाठी पावसाची प्रतीक्षा होतीच, पण मूग आणि कांदा ही हाताला आलेली पिके या पावसामुळे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.