पुणे - गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला (Maharashtra Kesari in Ahmednagar) आता पूर्णविराम मिळाला. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा डिसेंबर महिन्यात अहमदनगर येथे होणार आहे. ही स्पर्धा २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान वाडिया पार्क मैदानात खेळवली जाणार आहे. संयोजन समिती अध्यक्ष आमदार संग्राम जगताप तसेच संयोजन सचिव संतोष भुजबळ यांनी याबाबत माहिती दिली आहे
कुस्ती आणि वाद - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद तसेच इतर संघटनेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कुठे होणार याबाबत मल्लांसह आयोजकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला होता. सुरुवातीला पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असे जाहीर झाले होते. त्यानंतर पुन्हा नगर आणि मग गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठिकाणी ही स्पर्धा होणार असे सांगितले जात होते. पण आता आज झालेल्या बैठकीत एकाच ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असून ती अहमदनगर येथे होणार असल्याचे जाहीर झाले आहे.
दोन गटात रस्सीखेच - भारतीय कुस्तीगीर महासंघाकडून शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर नव्याने निवडणूक घेऊन खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन बॉडी तयार करण्यात आली. त्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यात पुण्यात आयोजित कुस्ती स्पर्धांना आयोजित करण्यासाठी बाळासाहेब लांडगे आणि रामदास तडस या दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच बघायला मिळाली.
न्यायालयाचा निकाल - न्यायालयाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बरखास्तीच्या निर्णयावर स्थगितीचा निकाल दिला. यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदमार्फत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार असे जाहीर करण्यात आले होते. यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने अहमदनगर येथे ही स्पर्धा होणार असल्याचे जाहीर केले. तरीही महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे होणार याबाबत संभ्रम असताना आता ही स्पर्धा अहमदनगर येथे होणार आहे, असे जाहीर करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.