अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात काही तालुक्यातील महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी आणि दुध पित असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. मग काय सर्वत्र मंदिरात भाविकांची गर्दी ( Nandi Drinking Milk ) झाली. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे पहिला प्रकार समोर आल्यानंतर परिसरात अनेक ठिकाणी नागरिकांनी नंदीला दुध पाजण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हे एक विज्ञान असून, अंधश्रद्धा असल्याचे सांगितले ( Nandi Drinking Milk Is Superstition) आहे.
नुकतीच महाशिवरात्री पार पडली असून, शनिवारी असाच एक प्रकार समोर आला. महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पीत असल्याची माहिती गावभर पसरली. नातेवाईकांनी राज्यभरात एकमेकांना फोन करून माहिती दिली आणि आपल्या परिसरातील मंदिरात हा प्रयोग करून पाहण्याचे सांगितले. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील चेतन नन्नवरे यांच्या मंदिरात हा प्रकार सायंकाळी 4 वाजता सुरु झाला.
नंदीच्या मूर्तीला काही भाविकांनी चमच्याच्या साहाय्याने पाणी पाजून पाहिले. एक-एक करता सर्वांच्याच हाताने नंदी पाणी पिऊ लागला. बघता-बघता भाविकांच्या रांगा लागल्या. घरून ग्लास, तांबे घेऊन लोक मंदिरात येऊ लागले. भगवान महादेवांच्या नावाचा जयघोष करीत नंदीला पाणी पाजू लागले. काहींनी हा प्रकार अंधश्रद्धा समजला तर काहींनी श्रद्धा समजून इतरांना देखील कळविले.
याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे म्हणाल्या की, कोणतीही निर्जीव वस्तू मूर्ती दूध पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. नंदीची मूर्ती पाणी दूध खेचते ते केवळ पृष्टीय ताण किंवा सरफेस टेन्शन या वैज्ञानिक तत्वामुळे, त्याला केशाकर्षण नियम असेही म्हणतात. समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात. तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अनुरेणूचा असलेला पृष्टीय थर हा दुसरा त्याच गुणधर्माचा थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो, मूर्ती स्वतः पाणी खेचते असते.
ती एका थेंबाच्या रूपात असते आणि नवीन पाण्याचा चमचा ज्या वेळेस त्या पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केला जातो. त्यावेळेस ते पाणी खेचले जाते. याला विज्ञानाच्या भाषेत सरफेस टेन्शन किंवा पृष्टीय ताण असे म्हटले जाते. या घटना खऱ्या आहेत. मात्र, त्याचे निदान चुकीचे काढले जात आहे. यामागे कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसून भाविकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा - PM In Pune Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आज पुणे दौऱ्यावर! 'ईटीव्ही भारत'कडून आढावा