(नेवासा)अहमदनगर- आजोबा राणूलाल सुराणा यांचे नाशिक येथे निधन झाल्याची समजलेली बातमी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्याची असलेली जबाबदारी अशा प्रसंगी आजोबांच्या अंत्यविधीला न जाता नेवासा तालुक्याचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी कार्यालयात जाऊन कामकाजाला सुरुवात केली.
नेवासा शहरात चौथा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर नेवासा शहरामध्ये अत्यंत कडकपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात १३ थर्मल गणद्वारे प्रत्येक नागरिकांचे सर्वेक्षण सुरू असल्याने नेवासा तालुक्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्यावर सर्व प्रशासकीय जबाबदारी आहे. मात्र, त्यांचे आजोबा राणूलाल सुराणा यांचे नाशिक येथे निधन झाले ही घटना कळल्यानंतरही भावूक झालेल्या सुराणा यांनी स्वत: सावरत १०.३० वाजता कार्यालयात गाठले.
तहसीलादारांनी संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात केलेल्या ४९ रुग्णांचे जेवणाचे नियोजन केले. १२ वाजता थर्मल गण द्वारे 'रिस्क एरिया'मध्ये स्वतः जाऊन सर्वेक्षण सुरू करून दिले. नंतर दीड वाजता त्यांनी घरी जाऊन पत्नीसह व्हिडिओद्वारे आजोबांचे अंत्य दर्शन आणि अंत्यविधीत सहभाग घेतला. यानंतर पुन्हा काही वेळाने सुराणा कार्यालयात हजर झाले होत लगेच ते कामाला लागले.