अहमदनगर - उद्योजक अब्दुल करीम सय्यद उर्फ करीम हुंडेकरी (वय- ७०) यांच्या अपहरण प्रकरणात दोन संशयित आरोपींना आज सकाळी जालना जिल्ह्यातील परतूर येथून अटक करण्यात आली. हे दोघे जालना जिल्ह्यातील परतूर येथील आहेत. वैभव विष्णु सातोंनकर (वय १९) व निहाल मुशर्रफ शेख ऊर्फ बाबा (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे अपहरण पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. अपहरणाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि पोलीस रेकोर्डवरील गुन्हेगार अजहर मंजूर शेख (रा-अहमदनगर) आणि त्याचा साथीदार फतेह सिद्दीक अहमद अन्सारी (रा-परतूर)मात्र पोलिसांना गुंगारा दिला आहे.
हेही वाचा - अपहरण झालेले करीमभाई हुंडेकरी सापडले... तपास सुरू
उद्योजक हुंडेकरी यांचे सोमवारी पहाटे त्यांच्या घराजवळून अपहरण झाले होते. जालना येथे त्यांना अपहरकर्त्यांनी सोडले. त्यानंतर ते बसने नगरला आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हुंडेकरी यांनी या अपहरणाची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी तपास करत कारवाई करत आहेत. खंडणीची रक्कम पुढील महिन्यात पाच डिसेंबर रोजी देण्याच्या अटीवर त्यांना जालना येथे आरोपींनी सोडून दिल्याची माहिती हुंडेकरी यांनी पोलिसांना दिली आहे. गुन्हे शाखेने परतूर शहरात आरोपीच्या घरी आज सकाळीच धडक मारली. त्यावेळी दोन आरोपी सापडले. मात्र, मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख आणि त्याच्या साथीदाराने पोलिसांना गुंगारा दिला आहे. आरोपींकडून एक चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.