अहमदनगर - पंकजा मुंडे यांनी इतर कुणाची भाषा बोलण्याऐवजी कामगारांसाठीची भाषा बोलावी, असा सल्ला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. ऊसतोड कामगार प्रश्नी वंचित बहुजन आघाडीतर्फे भगवानबाबा गडाच्या पायथ्याशी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा सल्ला देत आंबेडकर यांनी ऊसतोड कामगारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.
साखर कारखानदारी आणि त्याला निगडित असलेला ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूकदार आणि कामगार टोळ्यांचे आर्थिक व्यवहार पाहणारा मुकादम या तिन्ही घटकांना हात घालत आंबेडकर यांनी त्यांच्या प्रश्नांची यादी वाचली. तिन्ही घटकांनी एकत्र येत न्यायहक्कासाठी लढण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
तिन्ही घटक एकत्र आले तर प्रश्न मार्गी लागतील
साखर कारखानदार हा नेहमीच फायद्यात असतो, आजही आहे. ऊसाची तोडणी यंत्राद्वारे करणे कारखान्यांना तोट्याचे आहे. ही जमेची बाजू लक्षात घेऊन तिन्ही घटक एकत्र आले तर प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला. कामगारांना चांगला मेहनताना, कारखाणा स्थळावर राहण्याची व्यवस्था, शिक्षण-आरोग्य सुविधा, कोविड काळात विशेष कामगार विमा या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ऊस तोडणी करू नका, असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला.
हेही वाचा- शिर्डीत चालणाऱ्या तीन दिवसीय पुण्यतिथी उत्सवाचा आज मुख्य दिवस