शिर्डी (अहमदनगर) - संपूर्ण राज्यात आज (शनिवारी) भारतीय जनता पक्षाकडून दूध दरवाढीसाठी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात पुणतांबा गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला.
3 जून 2017 मध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव आणि त्यांना कर्ज माफी मिळावी, यासाठी पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी शेतकरी संप आंदोलन सुरू केले होते. यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यावेळी संपामध्ये दूध दरवाढीची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, संप करुन चार पूर्ण झाले आहेत. तरीही सरकार शेतकऱ्यांना गंभीर घेत नसल्याने शेतकरी आज पुन्हा एकदा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यात आज (शनिवारी) भारतीय जनता पक्षाकडून दूध दरवाढीसाठी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात पुणतांबा गावातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला. यावेळी शेतकरी नेते धनंजय धनवटे आणि धनंजय धोर्ड यांनी पुणतांबा ग्रामपंचायत कार्यलयाजवळील बळी राजाच्या पुतळ्याला दुग्धाचा अभिषेक करुन आंदोलनास सुरुवात केली. यावेळी शेतकऱ्यांनी डोक्याला काळे टिके लावत राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
हेही वाचा - अमरावतीत भाजपला आंदोलनासाठी दूध मिळेना; रिकामे कॅन घेऊन आंदोलन करण्याची वेळ
दुधाला 30 रुपये प्रतीलिटर भाव आणि 10 रुपये प्रतिलिटर अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. आजच्या आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते ही सहभागी झाले होते. दरम्यान, दूध दरवाढीसाठी पुणतांब्याच्या शेजारील लाखगंगा गावाने सर्वात आधी आंदोलनाचा इशारा दिला होता. या गावाने कालपासुनच (शुक्रवार) आंदोलनाला सुरुवात केली.