अहमदनगर - कर्जत तालुक्यातील खांडवी या गावाच्या परिसरामध्ये कूकडी प्रकल्पामधील निघालेले मोठ्या प्रमाणावर दगड राजरोसपणे बेकायदेशीर चोरले जात आहेत. त्यानंतर तिथेच दोन 'मोबाईल क्रशर' आणून एका बड्या ठेकेदाराने शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवण्याचा प्रकार सुरू केला आहे. विशेष म्हणजे हे क्रशर वनविभागाच्या माळढोक पक्षाच्या इको सेन्सीटिव्ह झोनमध्ये सुरू आहे. प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे. याबाबत थेट कर्जतचे तहसीलदार सी.एम.वाघ यांना विचारले असता त्यांनी चौकशी करून संबंधितावर कारवाई करू असे सांगितले आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल प्रशासन झोपा काढतेय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
वन्यजीवांच्या जीविताला धोका -
या परिसरात आरक्षित माळढोक अभयारण्य आहे. या प्रकारामुळे वन्य प्राण्यांना धोका निर्माण होऊन हे प्राणी मानवी वस्तीकडे फिरत आहेत. यामुळे प्राण्यांची दहशत आणि शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिक करत आहेत. तसेच आवाज आणि धुळीमुळे नागरिकांची जीवन व परिसरातील शेती संकटात येत आहे. नागरिकांनी कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयाना वेळोवेळी लेखी तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नाही. यामुळे नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
कर्जत तालुक्यातील भोसा खिंड हा मोठा बोगदा असलेला महत्वकांक्षी प्रकल्प कुकडी पाटबंधारे विभागाने काही वर्षापुर्वी पुर्ण केला आहे. यावेळी खोदकाम करताना जमिनीखाली मोठया प्रमाणात दगड-गोटे निघाले आहेत. कुकडी विभागाच्या हद्दीमध्ये ही महसूल संपत्ती असताना नगर येथील एका बडया ठेकेदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून मागील दोन महिन्यापासून या दगडाच्या डोगरांमध्ये बेकायदेशीरपणे विनापरवाना दोन मोबाईल क्रशर आणून, मोठे जनरेटर बसवून या दगडाची चोरी करून त्याची खडी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या माध्यमातून लाखो रुपयांची राॅयल्टी बुडवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
वनविभागाची परवानगी नाही -
ज्या ठेकेदाराने हे दोन मोबाईल क्रशर ज्या ठिकाणी टाकले आहेत, ते अभयारण्य माळढोक पक्षाच्या इको सेन्सीटिव्ह झोनमध्ये येत आहे. असे असताना तिथे याप्रकारच्या कामाला परवानगी मिळत नाही. तरीही संबंधितांनी विनापरवाना बेकायदेशीर क्रशिग सुरू केले आहे. याशिवाय पर्यावरण विभागाची परवानगी घेतलेली नाही. यामुळे क्रशरच्या आवाजाने अभयारण्यक्षेत्रातील ससा, हरीण, लांडगा, कोल्हे व इतर सर्व जीव घाबरून मानवी वस्तीकडे पळून जात आहेत. यामुळे अनेक वन्य प्राण्यांना जीव गमवावे लागले आहेत, तर शेतकरीवर्ग वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार करत आहेत.
कर्जत तहसीलदारांनी दिले चौकशी आणि कारवाईचे आदेश-
हा सर्व प्रकार पहाता ग्रामस्थांनी याबाबत कुकडी पाटबंधारे विभागाचे आधिकारी तसेच कर्जत तहसीलदार सी.एम.वाघ यांना लेखी व तोंडी तक्रार केली आहे. याबाबत तहसीलदारांनी कर्जत तालुक्यातील खांडवीमध्ये वनविभागाच्या व कुकडी पाटबंधारे विभागाच्या हद्दीमध्ये जी बेकायदेशीर दगड चोरून त्या ठिकाणी क्रेशर मशीन चालवले जात आहे, याबद्दल माहिती मिळाली असून यासंदर्भात कामगार तलाठी व मंडळाधिकारी यांना पाहणी करण्यास पाठवले आहे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून रॉयल्टी वसूल करण्यात येईल, असे सांगितले आहे.