अहमदनगर - शहरातील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ऑरसमध्ये वारंवार सूचना करूनही स्वच्छतेचे नियम पाळले न गेल्याने अखेर अन्न-औषध प्रशासनाने या हॉटेलवर सात दिवसाच्या परवाना निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या हॉटेलला मागील मार्च महिन्यात महानगरपालिकेने स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार दिलेला होता. हॉटेलवर कारवाई झाल्याने महापाकिकेच्या स्वच्छ अभियानावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
डिसेंबरपासून हॉटेलला सुधारणा करण्यास पाठपुरावा-
अन्न-औषध प्रशासनाने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात शहरातील सर्व हॉटेल्सची तपासणी केली होती. यात हॉटेल ऑरस (हॉटेल कपिराज) या बाहेरून चकाचक दिसणाऱ्या हॉटेल मधील किचनसह विविध विभागात चौतीस त्रुटी आढळून आल्या होत्या. यात मुखत्वे किचन मधील मुदतबाह्य झालेले अन्न पदार्थ, झुरळांचा मोठा वावर, मेलेली झुरळे, पेस्ट कंट्रोल केलेले नसणे, उघड्या भरलेल्या डस्टबीन, अनब्रँडेड ब्रेड, वृत्तपत्रांच्या रद्दीवर ठेवलेले खाद्यपदार्थ असे अनेक आरोग्याला बाधक पद्धतीची अवस्था दिसून आली. यावर संबंधित हॉटेल प्रशासनाला नोटीस देऊन सुधारणा करण्यास वेळ दिली. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा तपासणी केली असता चौतीस पैकी केवळ सहा त्रुटी मधेच हॉटेलने सुधारणा केल्याचे आढळून आले. त्यानंतर पुन्हा सुधारणा करण्यास सांगून खुलासा मागवला असता हॉटेल प्रशासनाने कोणताही खुलासा न केल्याने अखेर अन्न-औषध प्रशासनाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी हॉटेल ऑरस (हॉटेल कपिराज) वर 26 एप्रिल ते 2 मे 2021 असे सात दिवस परवाना निलंबित करत असल्याचे आदेश दिलेत.
हॉटेल ऑरसच्यावतीने मॅनेजर यांनी हॉटेलला महापालिकेने प्रथम पुरस्कार देऊन हॉटेलच्या स्वच्छतेची पावती दिलेली आहे, काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील. अन्न-औषध प्रशासनाच्या आदेशाबाबत पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले आहे.
महापालिकेच्या स्वच्छता सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह-
एकीकडे केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छता अभियान सर्वेक्षणात शहरात प्रथम आलेल्या हॉटेलवर अन्न-औषध प्रशासनाने अस्वच्छता असल्याचे प्रमाणपत्र देत कडक कारवाई केल्याने महापालिकेच्या स्वच्छता सर्वेक्षण अभियानावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हेही वाचा - पुण्यातील 'या' हॉटेलमध्ये 'मूकबधिर' कर्मचारी देताहेत ग्राहक सेवा