शिर्डी - कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानला निविदा प्रक्रिया न राबविता आवश्यक ती औषधे खरेदी करण्यास मुभा असावी. आवश्यक ते डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी भरती करावी. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व आरटीपीसीआर लॅब तातडीने उभारावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. डी. कुलकर्णी यांनी दिले आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोविडच्या सध्याच्या दुसऱ्या लाटेत वाढत असलेली रूग्णसंख्या लक्षात घेऊन, गेल्या आठ एप्रिलला अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत दिवाणी अर्ज दाखल करून याबाबतची मागणी केली होती. याचिकाकर्ते काळे यांच्यातर्फे अॅड. प्रज्ञा तळेकर व अॅड. अजिंक्य काळे यांनी काम पाहिले. सरकारतर्फे अॅड. एस. जी. कार्लेकर तर संस्थानतर्फे अॅड. अनिल बजाज यांनी काम पाहिले.
याबाबत माहिती देताना अॅड. अजिंक्य काळे म्हणाले, की साईसंस्थानचे नियोजित ऑक्सिजन निर्मिती प्लांट तातडीने उभारावा. जास्तीचा ऑक्सिजन सरकारी रुग्णालयाला पुरवावा. जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय सामुग्री व औषधे सरकारी दराने संस्थान रूग्णालयास उपलब्ध करून द्यावीत. तसेच जिल्ह्यातील अन्य रूग्णालयांचे देखील यादृष्टीने सर्वेक्षण करावे. डॉक्टर, परिचारिका व अन्य पदांची तातडीने भरती करावी. असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कोरोनाचा महामारीमुळे संकटात सापडलेल्या उत्तर नगर जिल्ह्याला साक्षात साईबाबा पावणार आहेत. साई संस्थानचे रुग्णालय जिल्ह्यातील कोविड रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने सज्ज होत आहे. साईभक्तीच्या प्रेरणेतून रिलायन्स उद्योगसमूहाने या रुग्णालयासाठी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प व कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारून देण्याची तयारी दर्शवीली आहे. रिलायन्स उद्योगसमूहाचे औदार्य उत्तर नगर जिल्ह्याला दिलासा देणारे ठरणार आहे.
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी काल चित्रफित जारी करून याबाबतचही माहिती दिली. त्यात त्यांनी रिलायन्स उद्योगसमूहाच्या मदतीची माहिती दिली आहे. समुहाचे आनंद अंबानी यांनी त्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या मदतीने पुढील दहा दिवसांत ऑक्सिजननिर्मिती व "एम्स'च्या मार्गदर्शनाखाली आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू करू, असे बगाटे यांनी जाहीर केले.
साई संस्थान ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणार होते. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार होती. आता रिलायन्सने मदतीचे हात पुढे केल्याने कालापव्यय टळणार आहे. संस्थान रुग्णालयात सध्या सध्या 110 ऑक्सिजन बेड आहेत.आणखी दोनशे ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी साईसंस्थानची वैद्यकीय व्यवस्था तयार ठेवण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर पूर्वतयारी सुरू आहे.
हेही वाचा -ऑक्सिजनकरता धावाधाव : भारत १० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्सची करणार आयात