अहमदनगर - नगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून काल सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने उसंत न घेता मुसळधार पाऊस सुरूच आहे. रात्रीपासून नगर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सीनानदीला पुरपरिस्थिती असून नगर-कल्याण महामार्ग, नालेगांव -लांडेथळ रस्ता, सावेडी-बोल्हेगांव रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीला बंद झाला आहे. नगर शहरातील रस्तेही झाले जलमय झाले असून सखलभाग असलेल्या नालेगांव परिसरातील काही नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.
बस अडकली, वाहकाला सुरक्षित बाहेर काढले -
कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलावर एक ट्रॅव्हलर बस पुराच्या पाण्यात अडकून पडली आहे. बसमधील चालकाला स्थानिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाहाचा जोर वाढल्यास बस वाहून जाण्याची भीती आहे.
जेऊरमध्येही ढगफुटी!! उच्चांकी पावसाची नोंद -
नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई आणि परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली असून धनगरवाडी आणि परिसरातील कांदे, मूग, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकरी वर्गात कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे. पावसाचे प्रमाण एवढे आहे की पिंपळगाव माळवी तलाव याच पावसात शंभर टक्के क्षमतेने भरू शकतो, अशी शक्यता आहे. बाजरी पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा होतीच. पण मूग आणि कांदा हे हाताला आलेली पिके या पावसामुळे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.