अहमदनगर- देशात सर्वत्र कोरोनाचे सावट पसरले आहे. तरी देखील नागरिकांनी आज मोठ्या उत्साहाने गुढी तोरण उभारून मराठी नव्या वर्षाचे स्वागत केले. साईबाबा मंदिरातही कलशावर गुढी उभारण्यात आली आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सपत्निक मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साईमंदिरच्या छतावर विधीवत पूजा करत गुढी उभारली.
साई मंदिरातील सर्व धार्मिक पूजा विधी पंचांगाप्रमाणे चालतात. आजही पंचागाची पूजा करण्यात आली असून साईबाबांच्या मूर्तीला गाठी कड्याची माळ घालण्यात आली. गुढीपाडव्याच्या दिवशी कडू निंबाच्या पाणाला विशेष महत्व आहे. निंब हा कडू असला तरी तो आरोग्यास हितकारक असतो. साईबाबांनीही आपल्या जीवनात अनेक कडू घटना पचवत जनमानवाला जागृक केले होते. दरम्यान, कोराणा विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने १७ मार्चला साईबाबांचे मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे, आज मराठी नववर्षाच्या निम्मीताने शिर्डी पंचक्रोशीतील भक्तांना साई मंदिरात जावून दर्शन घेता आले नाही. भक्तांनी साईंची प्रार्थना घरी बसूनच केली.
हेही वाचा- संचारबंदीला हरताळ, अहमदनगरातील बाजार समितीमध्ये तुडुंब गर्दी