अहमदनगर - राज्यात महावितरणकडून सक्तीची थकीत वीज बिल वसुली मोहीम राबविली जात आहे. या विरोधात भाजपचे नेते आंदोलने करत आहेत. नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सरास शेतीपंपाची वीज जोडणी महावितरण प्रशासनाकडून खंडित करण्यात येत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज (मंगळवार) नेवासा महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.
शेतकरी पावसाने आधीच हवालदिल झाला आहे. यातच वीज बिल सक्तीची वसुली सुरू आहे. या संदर्भात बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही महावितरण अधिकारी त्याकडे दुर्लक्ष केले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा महावितरण कार्यालयामध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविल्याने अनर्थ टळला.
महावितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच वीज प्रश्नाबाबत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा भाजपचे पदाधिकारी हे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. मुरकुटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले. नेवासा भाजपचे शिष्टमंडळाने शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली होती. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे संतप्त झालेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी महावितरण कंपनीच्या कार्यालयातच शेतकऱ्यांच्या वीज तोड प्रकरणी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी थांबविले. त्यांच्या बरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे ही उपस्थित होते. बाळासाहेब मुरकुटे यांचा स्वास रोखल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - Fuel Price : राज्य सरकारनेही इंधनावरील व्हॅट कमी करावा - नाना पटोले