अहमदनगर - शेळीवर झडप घालून उचलून नेताना शेळीसह विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन अधिकाऱ्यांनी विहिरीतून सुखरुप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खूर्द येथे घडली. शेतकरी रमेश भगत यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने झडप घातली होती.
बिबट्याची वन अधिकाऱ्यांकडून सुखरुप सुटका
शेळीसह बिबट्या विहिरीत पडल्याची बाब भगत व त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली. आसपासचे लोक जमा झाल्याने रात्रीच्या अंधारात विहिरीत बाज सोडून शेळीला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. कोपरगावचे वनपाल भाऊसाहेब गाढे विकास पवार गोरख सुरासे सूर्यकांत लांडे हे रात्रीच घटनास्थळी पोहोचले सकाळी बिबट्याला बाहेर काढताना गर्दी जमा होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी रात्रीच बिबट्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. रात्री एक वाजता त्यांनी विहिरीत बाज सोडली त्या बाजेवर बिबट्या बसला. काही वेळाने पिंजरा सोडून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करुन विहिरीतून सुखरुप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले.
हेही वाचा - Corona Deaths : काल सर्वाधिक 6 हजार 148 लोकांचा मृत्यू, अजूनही दुसरी लाट ओसरली नसल्याचा पुरावा