अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात वनविभागाच्या राखीव जमीनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याप्रकरणी 30 जणांवर वनविभागाने कारवाई केली आहे. या 30 जणांनी अतिक्रमण करण्याबरोबरच विभागाच्या अधिकाऱ्यांना वृक्षरोपण करण्यास विरोध केल्यामुळे यांच्यावर वन खात्याच्या कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात वनविभागाची राखीव वनजमीन आहे. या ठिकाणी गुरुवारी वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवड करण्यासाठी आले होते. त्यावेळी येथे अतिक्रमण केलेल्या लोकांनी त्यांना वृक्षरोपण करण्यास विरोध केला. वनविभागाकडून 23 महिला आणी 7 पुरुष अशा 30 जणांवर वन विभागाच्या कलमानुसार कारवाई केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासुन अनेक कुटुंबांनी करंजी येथे वनविभागाच्या जमीनीवर बेकायदेशीर वास्तव्य केले होते. वनविभागाकडून या कुटुंबीयांना अनेक वेळा सुचना देऊनही अतिक्रमण न हटवल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मुळे वन जमीनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांना मोठी चपराक बसणार आहे.