अहमदनगर - राहाता तालुक्यातील आश्वी येथील तरुण मित्र मंडळाच्या वतीने कष्टकऱ्यांसोबत भाऊबीज असा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. आपल्या गावापासून शेकडो मैल मोलमजुरीसाठी येणाऱ्या ऊस तोड कामगारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत तरुणांनी ऊस तोडणी महिलांना साडी-चोळी, कामगारांना स्वेटर, ब्लँकेट तसेच मिठाई वाटप केली. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तरुणांच्या उपक्रमाचे कौतुक करत कष्टकरी महिलांसोबत भाऊबीज साजरी केली. या अनोख्या भाऊबीजेच्या भेटीने कष्टकरी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
कारखान्याचा ऊस गळीप हंगाम सध्या सुरू आहे. घरापासून शेकडो मैल ऊसतोडणी कामगार थंडीची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करत आहेत. या कष्टकरी कामगारांप्रती आदरभाव दाखवत आश्वी येथील शेतकरी तरुणांनी एकत्र येत कष्टकऱ्यांसोबत भाऊबीज साजरी केली आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कष्टकऱ्यांना मिठाई तसेच स्वेटर, ब्लँकेट आणि महिलांना साडी - चोळी भेट दिली. ऊसतोडणी कामगारांच्या पाडावर ही भाऊबीज साजरी करण्यात आली. या कामगार बांधवांना केवळ ऊसतोडणी कामगार या दृष्टीने न बघता शेतकरी तरुणांनी त्यांना मायेने विचारपूस करून त्यांच्या श्रमांची पूजा व्हायला हवी, असे विखे पाटील म्हणाले आहे.
हेही वाचा - अहमद पटेलांवर मूळ गावी अंकलेश्वरमध्ये होणार अंत्यसंस्कार; नेत्यांनी व्यक्त केला शोक..