अहमदनगर - शेततळ्याच्या कडेला असणाऱ्या झाडाच्या सावलीला अभ्यास करण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर, तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांचासुद्धा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील विरगाव येथे घडली आहे.
हेही वाचा - बंगालमधील भाजपा कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू; तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप
अकोले तालुक्यातील विरगाव येथील घटना
अकोले तालुक्यातील विरगाव येथे आज (29 मार्च) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यात अश्विनी कृष्णांगर थोरात (वय 16) व कृष्णांगर जगन्नाथ थोरात (वय 45) या बाप-लेकीचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा मृत्यू
अकोले तालुक्यातील विरगाव येथील अश्विनी कृष्णांगर थोरात ही मुलगी दहावीचे शिक्षण घेत होती. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अभ्यास करण्यासाठी ती शेततळ्यावर गेली होती. उन्हाळ्याच्या मार्चमधील उष्णतेची दाहकता वाढत चालल्यामुळे घरात गरम होत होते. यामुळे अश्विनी शेतात अभ्यास करत होती. मात्र, या दरम्यान तिचा शेततळ्याच्या कागदावरून पाय घसरला आणि ती अगदी कोपऱ्यावरच घसरली. तिने शेततळ्याचा कागद धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही, म्हणून तिने जोरजोराने ओरडायला सुरुवात केली. आपल्या मुलीचा आवाज येत असल्याचे तिच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी हातातले काम टाकून थेट शेततळ्याकडे धाव घेतली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांचा देखील बुडून मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - बाळ बोठेला पुन्हा पोलीस कोठडी, सलग तिसऱ्या गुन्ह्यात चौकशी