अहमदनगर - पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. पावसामुळे उर्वरीत शेतकऱ्यांचाही पेरा राहिल्याने संगमनेर तालुक्यातील शेतकरी पावसाची वाट पाहतो आहेत.
संगमनेर तालुक्यात खरीपाच्या पेरण्या काही अंशी पूर्ण झाल्या असल्या, तरी अद्यापही बऱ्याच भागात पेरण्या झालेल्या दिसत नाहीत. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट, त्यातच हाताला काम नाही. कर्ज काढून शेतीची मशागत केली. बियाणे, खते विकत घेऊन पेरणी केली.
अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये बाजरी, ज्वारी, सोयाबीन अशी कडधान्याची पेरणी केली आहे. परंतु, पाऊस वेळेवर होत नसल्याने खरीपाचे पीक वाया जाणार की काय? यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. वेळेवर पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांचे खरीप पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. सध्या शेतात पेरलेले पीक तरारले. त्याला आता पाण्याची गरज आहे. मात्र, पाऊस पडत नसल्याने हे पीक हातचे जाईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.