अहमदनगर- शेगाव तालुक्यातील आखेगाव येथे जुने मातीचे घर कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. परिसरात अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळेच घर कोसळल्याचे सांगितल्या जात आहे. नानाभाऊ कोल्हे (वय ७९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कोल्हे हे शेळ्या बांधण्यासाठी मातीच्या घरात शिरले इतक्यात घर कोसळल्याने ते मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नसल्याने नंतर जे.सी.बी.मशीनची मदत घेण्यात आली. घटनेचा पंचनामा तलाठी गजानन शिकारे, पोलीस पाटील सुभाष केदार यांनी केला असून यावेळी मंडलाधिकारी अनिल बडे, सरपंच बाबासाहेब बोराडे इत्यादी उपस्थित होते. नानाभाऊ कोल्हे यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
हेही वाचा- निर्यातबंदीला विरोध : अहमदनगरमध्ये 'स्वाभिमानी'कडून कांद्याचे लिलाव बंद पाडत आंदोलन