अहमदनगर - नगर तालुक्यातील खांडके गावातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शेतातील झाडाला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. लक्ष्मण संपत गाडे, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी दिव्यांग होता. प्रशासनाने गावातील चारा छावणी बंद केल्याने आणि पाण्याच्या टँकरच्या खेपा निम्याने कमी केल्याने निराश शेतकऱ्याने जीवन यात्रा संपवल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले तसेच स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
मृत गाडे यांनी बुधवारी गावातील काही जणांना प्रशासन आणि शासनाच्या धोरणाबद्दल निराश असल्याचे बोलले होते. गेल्या 15 दिवसातील नगर तालुक्यातील चारा छावणी आणि पाणी बंद केल्याच्या निषेधार्थ झालेली ही दुसरी आत्महत्या आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाबद्दल प्रचंड नाराज असून येत्या रविवारी आणि सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान नाराजीचे पडसाद मुख्यमंत्र्यांसमोर दिसतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
जिल्हा परिषद सदस्य असलेले शिवसेनेचे नेते संदेश कार्ले यांनी ग्रामस्थांची संतप्त भावना पाहाता, आंदोलन होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात 19 जुलै पासून गैरव्यवस्थापनाचे कारण देत प्रशासनाने नगर तालुक्यातील 4 चारा छावण्या बंद केल्या होत्या. त्यानंतर प्रशासन विरुद्ध ग्रामस्थ, असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यात मुख्यमंत्री 2 दिवसांनी जिल्ह्यात महाजनांदेश यात्रेच्या निमित्ताने येत असतानाच अजून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने वातावरण तापणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते करत आहेत.