अहमदनगर - राज्यात लक्षवेधी ठरलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा अधिकृत जाहीर प्रचार रविवारी सायंकाळी ठीक पाच वाजता थंडावला. तत्पूर्वी युतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करत ठिकठिकाणी भेटी देत प्रचार रॅली आणि भाषणातून आपली भूमिका मांडत शक्तीप्रदर्शन केले. भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यावेळी उपस्थित होते.
दहशतीला झुगारून विचारसरणीला मत द्या -
डॉ. सुजय यांनी प्रचार रॅलीतून शक्ती प्रदर्शन करताना भाषणातून प्रमुख विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली. विरोधातील उमेदवार ठिकठिकाणी फोन करून दबाव आणत असल्याचा आरोप डॉ. सुजय यांनी यावेळी केला. मात्र, या दबावतंत्राचा आपल्यालाच फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक विचारांची लढाई आहे. पुढील पंचवीस वर्षाचे भवितव्य येथील जनतेचे त्यातून अधोरेखित होणार असल्याने उज्वल भवितव्यासाठी डॉ. सुजय पाहिजे की, दहशतीसाठी विरोधी उमेदवार पाहिजे, याचा विचार जनतेने करावयाचा असल्याचे त्यांनी सांगितले.