अहमदनगर - नगर-सोलापूर महामार्गावर शहराजवळ असलेल्या चांदणी चौकात रस्त्याच्या फूटपाथवर झोपलेल्या तीन बूटविक्रेत्यांना रात्रीच्या सुमारास आयशर टेम्पोने चिरडले. या अपघातात एक बूटविक्रेता जागेवरच ठार झाला. तर इतर दोघे बूटविक्रेते तसेच टेम्पोतील दोघे असे एकूण चारजण जखमी झाले आहे. मेहताब शेख (21), मुसाईद शेख (25), जावेद शेख (20, तिघेही रा. उत्तर प्रदेश) अशी बूटविक्रेत्यांची नावे असून यापैकी मेहताब शेख याचा जागेवरच मृत्यू झाला. तर उर्वरित दोन जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पोचालक घटना स्थळावरून फरार झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
रात्री दोनच्या सुमारास झाला अपघात-
सोलापूरहून नगरच्या दिशेने येत असलेला एक मालवाहू आयशर टेम्पोच्या चालक चांदणी चौकातील आरटीओ ऑफिसजवळ पोहोचला असता त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. यावेळी फूटपाथवर गाढ झोपेत असलेल्या तीन बूटविक्रेत्यांना या टेम्पोने चिरडले. यात मेहताब शेख याचा मृत्यू झाला, तर झोपलेले इतर दोघे, तसेच टेम्पोतून प्रवास करणारे दोघे असे एकूण चार जण या अपघातात जखमी झाले. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा- 'भारत-पाकिस्तानने चर्चा करून सीमेवरील रक्तपात थांबवावा'