अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील दोघींनी मालेगाव येथील एका विवाहित महिलेस केटरिंगच्या कामासाठी बोलावून चक्क इंदौर येथे 1 लाख 20 हजार रूपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना अजुन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे कमवण्यासाठी बनावट नवरदेव उभा करून लग्न लावून लोकांना लुटणारी टोळी उघड झाली आहे. पैसे कमवण्यासाठी बनावट नवरदेव उभा करून लग्न लावून लोकांना लुटणाऱया या टोळीने श्रीरामपूर तालुक्यातील चार जणांची फसवणूक केली आहे. तसेच राज्यातील अनेक लोकांची या टोळीने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे.
टोळीने एका मुलीचे दुसऱ्याशी लग्न लावून दिल्याचे आढळून आले. ही दहा ते बारा जणांची टोळी कार्यरत असून नागरिकांनी अशा प्रकारणांपासून सावध राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुजाता शेखर खैरनार, ज्योती ब्राम्हणे, अनिता कदम ( रा.दत्तनगर, ता.श्रीरामपूर ) व जयश्री ठोंबरे (रा.कोल्हापूर) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या चार आरोपींसह एकूण दहाजणांविरूद्ध पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा समोर आला हा प्रकार -
मालेगाव येथील मोतीनगर भागातील एका विवाहित तरुणीची विक्री करण्यात आल्याचा प्रकार 15 जानेवारी रोजी समोर आला होता. या विवाहितेच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आपल्या पत्नीला 1 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आले. ही विवाहिता श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे बहिणीकडे राहण्यासाठी आली असता. शेजारील एका महिलेने तीला केटरिंगच्या कामासाठी नेले व तेथून ती इंदोर येथे कामानिमित्त गेली. मात्र 9 डिसेंबरपासून ती घरीच परतली नाही, असे विवाहितेच्या पतीने फिर्यादीत म्हटले होते.
गुन्ह्याची व्याप्ती -
प्रथमदर्शनीच हे काहीतरी वेगळे प्रकरण असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास केला असता, इंदोर येथील तरुणाला विवाहात अडकवून फसविल्याचे समोर आले. श्रीरामपूर येथील चार तरुणांच्या या टोळीने फसवणूक केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी हे प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. मात्र, प्रतिष्ठेला तडा जाईल. या भीतीने कोणीही पुढे येत नाही, अशी माहिती मनोज पाटील यांनी दिली. या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. अजूनही अनेक आरोपी रडारवर आहेत. मात्र गुन्ह्याच्या तपासाकरिता गुप्तता पाळण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - सिक्किममध्ये होणार फिल्म सिटी? उच्चस्तरीय बैठकीत चर्चा