अहमदनगर- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील संस्थांमधील प्रकरणाच्या चौकशीची मागणी राधाकृष्ण यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अशोक विखे पाटील यांनी करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 20 मेपासून लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या पुतळ्यासमोर डॉ. अशोक बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहेत.
याबाबत अशोक विखे -पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शुक्रवारी सायंकाळी भेट घेत आपली कैफियत मांडली. अण्णांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यासाठी हक्काच्या कुकडी पाणी प्रश्नावर त्यांनी अण्णांची भेट घेतली होती. तर निवडणूक काळात डॉ. सुजय विखे पाटील यांनी अण्णांची भेट घेत आशीर्वाद घेतला होता. आता डॉ. अशोक विखे यांनी भेट घेतल्याने अण्णा डॉ. अशोक यांच्या मागण्यांबाबत काय प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
आंदोलन न करण्याची पोलिसांची विनंती
लोणी ग्रामपंचायतीने लोणी पोलिसांना एक पत्र देऊन अशोक विखे यांच्या पद्मश्री विठ्ठलराव विखेंच्या पुतळ्यासमोर आंदोलन झाल्यास गावात शांतता बिघडू शकते, असे कळवले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशोक विखे यांना विनंती करत कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, असे कारण देत उपोषण आंदोलन न करण्याची विनंती केली आहे. मात्र, अशोक विखे हे आंदोलनावर ठाम असून राधाकृष्ण विखे दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे.
या आहेत अशोक विखेंच्या मागण्या
राधाकृष्ण विखे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या अधिपत्याखाली असलेल्या खासगी, सहकारी आणि त्यांच्या सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी आहे. नगर जिल्ह्यातील प्रवारानगर, गणेश, राहुरी या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळावेत. वादग्रस्त झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने प्रवरा मेडिकलला दिलेल्या देणग्यांची चौकशी करावी. जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकाराचा तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई व्हावी. जिल्हा परिषदेत 2004 ते 2009 या काळात झालेल्या शालेय पोषण आहारातील गैरप्रकाराची चौकशी करावी. श्रीरामपूरच्या मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी. या संस्थेला सरकारकडून मिळालेली रक्कम सभासदांच्या खात्यात जमा करावी, अशा मागण्यांसाठी अशोक विखे यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे.