अहमदनगर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने धार्मिक स्थळांमध्ये दर्शनावर बंदी घातली. यानंतर राज्यातील सर्व मंदिरं बंद करण्यात आली. 17 मार्च पासून शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. मात्र साई समितीच्या वतीने मंदिराबाहेर देणगीचा काऊंटर सुरू करण्यात आले.
शिर्डी भक्तांना देणगी देण्याची इच्छा असल्याने संस्थानाच्या वतीने चार नंबर प्रवेशद्वारा शेजारी डोनेशन काऊंटर सुरू करण्यात आले आहे. दानशूर भाविकांना देणगी देण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलीय. मात्र अद्याप दर्शन घेण्यासाठी मंदिर उघडले नसल्याने भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे.
कोरोना विषाणूमुळे देशातील धार्मिक स्थळांना कुलूपं लागली. राज्य सरकारने तीन महिन्यांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल केले आहे. मात्र अद्याप भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी असल्याने बाहेरून कळसाचे दर्शन घेता येते. श्रद्धेपोटी तिजोरीत दान टाकता येत नसल्याची अडचण लक्षात घेता संस्थान प्रशासनाने महामार्गालगत असलेल्या साईमंदिर प्रवेशद्वार क्रमांक चार शेजारी भाविकांच्या सोयीसाठी देणगी कक्ष सुरू केला आहे.
पगारासाठी पैसे नाहीत
मागील महिन्यात शिर्डी देवस्थानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी देवस्थानाकडे पैसे नसल्याचे वृत्त होते. देवस्थानातील कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार देण्यात आला नव्हता.