अहमदनगर- दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातील नगर तालुक्यातील सतरा गावांसाठी वरदान ठरणारी साकळाई पाणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या आराखड्यास मंजुरी दिली जाईल, अशी घोषणा केल्याने आनंद झाल्याचे आणि आता ही योजना पूर्णत्वास येणार असल्याचे अभिनेत्री आणि शिवसंग्रामच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाळकी येथे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्राचारार्थ जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या योजनेच्या आराखड्यास मंजुरी दिली जाईल, अशी घोषणा केली. या योजनेसाठी दीपाली सय्यद यांनी अनेक आंदोलने केली आहेत. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत डॉ. सुजय यांच्या पुढाकारातून बैठका घेण्यात आल्या आहेत.
सध्या आचारसंहिता असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक वक्तव्य करत या योजनेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश दिला आहे. यावर सरकार ही योजना निश्चितपणे पूर्णत्वास नेईल, असा विश्वास दीपाली यांनी व्यक्त केला आहे.