शिर्डी Demonetization : साईंचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून साई भक्त शिर्डीत येतात. दर्शनानंतर साईभक्त दान कक्षात जाऊन संस्थेला देणगी देतात. मंदिर परिसरात लावलेल्या दान पेट्यांमध्ये दानही केलं जातं. त्यात 2000 रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे. तथापि, भारतीय रिझर्व्ह बँकेनं 19 मे 2023 रोजी एक परिपत्रक जारी केलं होतं. त्यावेळी 2000 रु. चलनी नोटा दि. 30 सप्टेंबर 2023 नंतर बँकेत जमा करता येणार नाहीत, असं म्हटलं होतं. त्यामुळं साईबाबा संस्थानानं 2000 रु चलनी नोट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 19 मे पासून आज 30 सप्टेंबर पर्यंत साईबाबा संस्थानला दोन हजारांच्या 19 हजार 940 नोटा भाविकांनी साईबाबांना दान स्वरुपात दिल्या आहेत. त्याची किंमत 3 कोडी 98 लाख 80 हजार आहे.
2000 च्या नोटा स्वीकारणार नाही : शिर्डी येथे येणाऱ्या सर्व साई भक्तांना साईबाबा संस्थान प्रशासनाच्या वतीनं विनंती करण्यात आली आहे. साईबाबा संस्थान देणगी स्वरुपात 2000 च्या नोटा स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच साई भक्तांनी 2000 रु नोटाही देणगी बॉक्समध्ये टाकू नये असं अवाहन साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केलंय.
दानपेटीत बंद झालेल्या नोटांची आवक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500, 1000 रुपयांच्या नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर 31 डिसेंबर 2016 पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जुन्या नोटा बदलल्या जात होत्या. या काळात साई संस्थाननं जुन्या नोटा तातडीनं बँकेत जमा केल्या होत्या. 31 डिसेंबरनंतर बंद झालेल्या जुन्या नोटा स्वीकारणं बंद केलं होतं. मात्र आजही दानपेटीत बंद झालेल्या 500, 1000 च्या नोटांची आवक सुरूच आहे.
बंद झालेल्या नोटा तिजोरीत पडून : संस्थानच्या दानपेट्या उघडून धर्मादाय आयुक्तांच्या उपस्थितीत नोटांची मोजणी करण्याचा नियम आहे. इतर चालू चलनी नोटा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा केल्या जातात. जुन्या नोटा वितरित केल्यानंतर स्वतंत्र रेकॉर्ड ठेवला जातो. धर्मादाय आयुक्तांच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी घेतली जाते. बंद झालेल्या नोटा बँकेत जमा करता येत नसल्यानं त्या नष्टही करता येत नाहीत. आतापर्यंत संस्थेच्या तिजोरीत जमा झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांची संख्या तीन कोटींहून अधिक आहे. या नोटांबाबत संस्थेनं रिझर्व्ह बँकेकडं बराच पाठपुरावा केला होता, मात्र अद्याप यश आलेलं नाही. सध्या बंद झालेल्या नोटा संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत.
2 हजाराच्या 99 नोटा जमा : साईबाबा संस्थानच्या दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या देणग्याची साई संस्थानकडून आठवड्यातून दोनदा मोजणी केली जाते. गेल्या मंगळवारपासून आज शनिवारपर्यंत भक्तांनी दान केलेल्या नोटांची मोजणी झाली आहे. यात 2 हजार रुपयांच्या 99 नोटा जमा झाल्या आहेत. साई संस्थान उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारणं बंद करणार आहे.
हेही वाचा -