शिर्डी - सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम यावर बनावट अकाउंट काढून नामांकित लोकांचे नाव टाकून पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे वारंवार येत आहेत. याचा फटका आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनाही बसला आहे. फेसबुकवर त्यांच्या नावाचे बनावट अकाऊंट तयार करुन एका अज्ञात व्यक्तीने पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर क्राइमकडे तक्रार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
गुगल पे व फोन पेवर पैशाची माग
सिद्धार्थ थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हणाले आहे, की एका अज्ञात व्यक्तीने जयश्री थोरात यांच्या नावे एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आहे. त्याचा गैरवापर करून या व्यक्तीने दि.1 मार्च व 2 मार्च रोजी रात्री 10च्या सुमारास जयश्री थोरात या फेक अकाउंट अनाधिकाराने वापर करून मेसेजच्या माध्यमातून गुगल पे व फोन पेवर पैशाची मागणी केली आहे. हा प्रकार म्हणजे एक खोडसाळपणा असून एकतर पैसा कमविण्यासाठी उभे केलेले ते एक षडयंत्र असू शकते किंवा बदनाम करण्याचे कट कारस्थान. त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.