अहमदनगर - उत्तर अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण भरल्यानंतर निळवंडे धरण देखील 84 टक्के भरले आहे. यामुळे निळवंडे धरणातून 5,600 क्यूसेक प्रवाहाने प्रवरा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. तर 26 टीएमसी क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा सद्य स्थितीत 70 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे गोदावरी, प्रवरा आणि भीमा या तीनही मोठ्या नद्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख तीन धरणांपैकी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक समाधानकारकरित्या होत असल्याने मुळा धरण येत्या काही दिवसात पूर्ण क्षमतेने भरेल अशी माहीती आहे.
जिल्ह्यामधील गोदावरी, प्रवरा आणि भीमा या तीनही मोठ्या नद्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तर प्रशासनाने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीमध्ये सोमवारी सकाळी सहा वाजता 2 लाख 91 हजार 525 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे भीमा नदीमधून 1 लाख 91 हजार 788 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. सोबतच भीमा नदीवरील पूल वाहतुकीसाठी रविवार रात्रीपासून बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये सर्वदूर समाधानकारक पाऊस पडत असल्याने एकीकडे धरणे भरली असुन शेतीतील पिकांना जीवदान मिळाले. यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे.