शिर्डी (अहमदनगर) Crowd In Shirdi Saibaba : नाताळाच्या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविकांनी शनिवारी (23 डिसेंबर) पासूनच साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठी गर्दी केलीय. रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून साईबाबांचे मुख्य दर्शन, कळसाचे दर्शन तसेच साई समाधीचे दर्शन (Sai Mandir Shirdi) अशा विविध मार्गाने दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल एक लाख भाविकांनी दर्शन घेतलंय.
समाधी दर्शनासाठी तीन ते चार तास : साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी भाविकांना जवळपास तीन ते चार तास लागत आहेत. साईबाबा संस्थानच्या विविध सुरक्षा एजन्सी या साईबाबा मंदिर, दर्शन लाईन, मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतायेत. त्याचबरोबर मंदिराबाहेरील सुरक्षा शिर्डी पोलीस पाहतायेत. (Sai Sansthan Shirdi)
सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत गर्दी वाढली : शिर्डीत आलेल्या भाविकांच्या दर्शनाची, भोजनाची आणि निवासाची व्यवस्था संस्थानच्या वतीनं करण्यात येत आहे. एकंदरीत सुट्टीमुळे शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली असून, नवीन वर्षापर्यंत भाविकांची गर्दी शिर्डीत अशीच राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिलीय.
साई मंदिर रात्रभर खुलं राहणार : नाताळाच्या सुट्ट्या, नवीन वर्षांचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दरवर्षी भाविकांची शिर्डीत मोठी गर्दी होत असते. भाविकांना साईबाबांच्या समाधीचे दर्शन मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 31 डिसेंबर रोजी साईबाबांचे समाधी मंदिर रात्री खुलं ठेवण्यात येणार असल्याचंही साईबाबा संस्थानच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
शिवराज सिंह चौहान लावतात हजेरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील लाखो भाविक शिर्डीत दाखल होत असतात, याच बरोबरीने राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरही साईबाबांच्या दर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतात. दरवर्षी मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान न चुकता दरवर्षी 31 डिसेंबर रोजी शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथून पायी चालत येत साईबाबांच्या मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतात. ते 1 जानेवारी रोजीच्या साईबाबांच्या काकड आरतीला हजेरीही लावतात. मध्यप्रदेशसह देशातील जनतेला नवीन वर्ष सुखाचे आणि समृद्धीचे जावे यासाठीही साईंचरणी चौहान प्रार्थना करतात.
हेही वाचा: