अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ( Chief Minister Eknath Shinde ) गटाने स्व.बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या स्मृतिस्थळास आदरांजली वाहिल्यानंतर तिथे गोमूत्र शिंपडल्याबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve Minister State Central Railway ) यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेवर टीका केली आहे. ज्या बाळासाहेबांना अख्या हयातीत ज्यांनी शिव्याशाप दिले, ते बाळासाहेब आज हयात नसताना काँग्रेस बरोबर मनोमिलन करणाऱ्यांवरच गोमूत्र शिंपडले पाहिजे अशी टीका दानवे यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचा घेतला समाचार - आज अहमदनगर-आष्टी रेल्वे मार्गावर रेल्वेच्या दुसऱ्या फेरीचा शुभारंभ दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकी नंतर माध्यमांशी बोलताना दानवेंनी उद्धव सेना, काँग्रेसच्या जवळकीवर ही टीका केली. यावेळी खा.सुजय विखे, खा.प्रीतम मुंडे, आ.बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, रेल्वेच्या सोलापूर विभागाचे अधिकारी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
सावरकरांवर बोलण्याचा अधिकार नाही - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस खा.राहुल गांधींनी वर बोलताना दानवे म्हणाले की , ज्यांना सावरकर माहीत नाहीत अशांना त्यांच्यावर बोलण्याचा टिका करण्याचा अधिकार नाही. सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अकरा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांनी इंग्रजांकडे कधीही माफी मागितली नाही. माफी मागितली असती तर त्यांना शिक्षा झालीच नसती, मात्र ज्यांना इतिहास माहीत नाही त्यांनी सावरकरांवर बोलू नये असे दानवे यावेळी म्हणाले
भविष्यात परळी-बीड-पुणे रेल्वे सेवा - भविष्यात बीड,परळी, आष्टी ते नगर पुणे अशी रेल्वे सेवा नक्कीच सुरू होईल, पहिल्या टप्यात आष्टी-नगर या साठ किलोमीटरचा पहिला टप्पा सुरू झाला असून खा.प्रीतम मुंडे, खा.विखे यांच्या पाठपुरावा यासाठी सातत्याने राहिल्याची माहिती दानवेंनी यावेळी दिली.