शिर्डी - कोपरगाव शहरातील नामवंत विद्यालयातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात 13 व्यक्ती आल्या होत्या. त्या 13 व्यक्तींपैकी कोपरगाव शहरातील एका महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
लोणी येथील रहिवासी असलेला, मात्र कोपरगाव शहरातील नामवंत विद्यालयात लिपिक या पदावर कार्यरत असणारा कर्मचारी दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. 13 पैकी एका महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर बाकीच्या 12 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तब्बल दोन महिन्यानंतर कोपरगाव तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा तपास करून परिसर सील करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.