अहमदनगर- महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विद्युत वाहिनीच्या खांबावर चढून काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे मृताचे नातेवाईक आणि नागरिक संतप्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीच या कर्मचाऱ्याच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप करत नागरिकांनी त्या कर्मचाऱ्याचा मृतदेह नगरच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या दारात आणून ठेवला आहे. रुपेश सुखदेव भैरट असे त्या मृत कर्मचाऱ्याचे नाव होते.
या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य संदेश कार्ले यांनी या घटनेला वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना भरीव आर्थिक मदत घ्यावी आणि अशा घटनांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद गावातील ही घटना आहे. आधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी हा मृतदेह महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर ठेवुन ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी. तसेच संबधित आधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणानंतर महावितरणच्या कार्यालयात तणावाचे वातारण निर्माण झाले होते. त्यानंर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
एक महिन्यातील दुसरी घटना-
जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी यावेळी माहिती देताना एकट्या नगर तालुक्यात एका महिन्यात दोन वीज कंत्राटी कामगार वीज पोलवर काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने मृत्युमुखी पडले असल्याचे सांगितले. याला जबाबदार असतील अशा अधिकाऱयांवर कारवाई झाली पाहिजे. कंत्राटी कामगार युवक आहेत, त्यांच्यामागे ती कुटुंबे आर्थिक अडचणीत आलेली आहेत. मात्र वीज वितरण अशा घटनांनंतर कुटुंबांना भरीव आर्थिक मदत करत नाही. त्यामुळे आता भरीव आर्थिक मदतीची घोषणा झाल्या खेरीज मृतदेह वितरण कंपनी समोरून हलवणार नाही असा इशारा कार्ले यांनी दिला आहे