शिर्डी - कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला. या काळात हॉटेल, लॉजिंग या सर्व व्यवसायांना टाळे ठोकण्याची वेळ आली. मात्र, या लॉकडाऊन काळात आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या शिर्डीतील एका हॉटेल व्यावसायिकाला महावितरणने वीजबिलाचा झटका दिला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद असताना देखील महिन्याला ४० ते ४५ हजार रुपये बिल आकारण्यात आले आहे. अशा प्रकारे शहरातील बहुतांश हॉटेल, लॉज चालकांना वीज वापर होत नसताना देखील बिलाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे या हॉटेल व्यावसायिकांना दुष्काळात तेरावा महिना असल्याचा अनुभव आला आहे. आता हे लाईट बिल कमी कऱण्याची मागणी या व्यावसायिकांकडून केली जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून शिर्डीतील साई मंदिर भाविकांना दर्शानासाठी बंद ठेवण्यात आले. परिणामी शिर्डी शहरातील हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय पूर्ण पणे बंद आहेत. या काळात हॉटेल, लॉज व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यातच शिर्डीतील एका हॉटेल मालकाला एका महिन्याला 40 ते 45 हजार रुपयाचे लाईट बिल आकारण्यात आले आहे. इतर व्यावसायिकांचीही अशीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
लॉकडाऊन होण्यापूर्वी एका लॉजिंगचे लाईट बील महिन्याला साधरणतः 45 ते 50 हजार रुपये इतके येत होते. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर भाविक शिर्डीत येत नव्हते. त्यामुळे हॉटेल आणि लॉजिंग पूर्ण पणे बंद आहे. या काळात विजेचा वापरही केला जात नाही. तरीही महावितरणकडून पूर्वीप्रमाणेच वीजबिलाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्यांने पाहून आधिच आर्थिक संकटात सापडल्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांकडून केली जात आहे.
शिर्डी शहरात आज मितीला साधारणतः 350 लॉजिंग आणि 150 हॉटेल्स आहेत. लॉकडाऊन पूर्वी या हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायची साधरणतः महिन्याकाठी 20 कोटी रुपयांची उलाढाल होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्याने गेल्या सहा महिन्यापासून एका एका हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. त्यात अजुनही साई मंदिर खुले करण्याचे आदेश आले नसल्याने किती दिवस अजुन नुकसान सहन करावे लागणार हे सांगता येणार नाही. त्यातच महावितरणच्या वीजबिलाच्या झटक्याने हे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.