अहमदनगर - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणेंनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज श्रीरामपुरातील दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे यांच्या घरी जाऊन करण आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नगर दक्षिण मतदारसंघातून मोकळे झालेल्या विखे कुटुंबीयांनी आणि युतीच्या नेत्यांनी शिर्डीत आता जोर लावला आहे. राधाकृष्ण विखे पाटील बैठका घेऊन प्रचार करत आहेत तर, सुजय विखेही युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंसाठी जाहीर सभा घेत आहेत. त्यात गुरुवारी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या वक्तव्याने नाराज झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत खळबळ माजवली होती. दरम्यान, आज भाजपने पुढची राजकीय खेळी खेळत श्रीरामपुरचे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे आणि त्यांच्या मातोश्री माजी नगराध्यक्षा राजश्री यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.
श्रीरामपूर तालुक्यात ससाणेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यात मतदारसंघात माळी, धनगर, वंजारी समाजाचे प्राबल्य आहे. गुरूवारी ससाणेंना अवघ्या २२ दिवसात राजीनामा द्यावा लागल्याने समाजात काहीशी नाराजी पसरली होती. त्यामुळे आज ससाणेंच्या घरी अचानक जाऊन मतांचे समीकरण जुळविण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. ससाणेंच्या भेटीनंतर करणच्या खांद्यावर हात ठेवत मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले असेल याचीही चर्चा रंगत आहे.