अहमदनगर - राहुरी तालुक्यातील मुळा धरणात मोठ्याप्रमाणात मत्स्य उत्पादन घेतले जाते, त्यामधील विशेषत: चिलापी माशांना थेट परदेशात निर्यात केले जात आहे. गोड्या पाण्यातील या चिलापी माशांना दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करण्याऱ्यांना कोरोनाच्या मंदी नंतर आता मोठा दिलासा मिळाला आहे. धरणात पिंजरा पद्धतीने मत्स्य पालन केले जात आहे आणि ते फायद्याचेही ठरत आहे.
चिलापी माशांच्या उत्पादनाकडे कल-
मुळा जलाशयात सुरू असलेल्या मत्स्य संवर्धन व्यवसायात अनेक उच्च शिक्षीत तरुणांचा सहभाग आहे. त्यामुळे या तरुणांनी पांरपरिक मासेमारीला फाटा देत बाजारात मागणी असणाऱ्या माशांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. गोड्या पाण्यातील चिलापी काळ्या आणि गुलाबी माश्यांना महाराष्ट्रातून मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांनी या जातीच्या माशांच्या उत्पादनास प्राधान्य दिले. तसेच या माशांना मिळणारा दरही चांगला आहे.
माशांना परदेशातून मागणी -
तरुणांनी सुरू केलेल्या या मस्त्य व्यवसायाला चांगले दिवस सुरू असतानाच गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनचा फटका बसला. यावर उपाय म्हणून या माशांची विक्री करण्यासाठी त्यांनी परदेशातील बाजारपेठाचा पर्याय अंवलंबून पाहिला. तर आता या माशांना परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या मत्स्य व्यावसायिकांनी थेट परदेशात या माशांची निर्यात सुरू केली. सध्य स्थितीत मुळा धरणातील तब्बल 150 टन माशांची ऑर्डर मिळाल्याने हा माल मुंबई मार्गे थेट दक्षीण अफ्रिकेत निर्यात केला जाणार असल्याचे येथील मत्स्य व्यावसायिकांनी सांगितले. त्याचा या व्यावसायिकांना मोठ्या प्रमामाणात आर्थिक फायदा होणार आहे.