अहमदनगर - कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाचे प्रेत वारसांच्या ताब्यात देताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांसह वैद्यकिय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अंत्यविधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करून गर्दी जमविल्या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांवर देखील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण -
मूळचे संगमनेर तालुक्यातील असलेले श्री 1008 महंत स्वामी अमगिरी महाराज हे गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आश्रमात वास्तव्यास होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, 18 मार्च रोजी महंतांचे निधन झाले. महंत अमगिरी महाराज यांचा संगमनेर, सिन्नरसह राज्यभरात मोठा भक्त परिवार आहे. महंतांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंतिम दर्शनासाठी नातेवाईक आणि शेकडो भक्तांनी बेट येथील स्मशानभूमीत गर्दी केली होती. शासनाच्या कोविड नियमावलीनुसार प्रशासन प्रेतास अग्निडाव देण्याची तयारी करत असतानाच नातेवाईक आणि भक्तांनी प्रशासनासोबत हुज्जत घालत महंतांना अग्निडाव देऊ नका आम्हाला त्यांची समाधी बांधायची आहे, अशी भूमिका घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, तहसीलदार योगेश चंद्रये आणि पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी नातेवाईक आणि भक्तांना शासन नियमावली संदर्भात अवगत केल्याने, अखेर महंत अमगिरी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.